मुंबई - विजय हजारे करंडक स्पर्धेला २० फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई संघाची धुरा श्रेयश अय्यरकडे सोपविण्यात आली आहे. अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे सय्यद मुश्ताक अली करंडक खेळू शकला नव्हता. आता तो दुखापतीतून सावरला आहे.
मुंबई क्रिकेट संघाने विजय हजारे करंडकासाठी २२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यात अय्यरकडे कर्णधारपद तर पृथ्वी शॉ याच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
फलंदाजीची धुरा शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान आणि अखिल हरवादकर यांच्यासह अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तारे याच्यावर आहे.
गोलंदाजीची कमान धवल कुलकर्णीसह तुषार देशपांडे, आकाश पारकर, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर याच्यावर आहे.
दरम्यान, मंगळवारी भारतीय संघाचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.