अबुधाबी -आयपीएलची अंतिम फेरी गाठता न येणे, ही बाब आमच्यासाठी लाजिरवाणी असल्याची कबुली सनरायझर्स हैदराबादचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने दिली. दिल्ली कॅपिटल्सने उपांत्य फेरीत हैदराबादचा १७ धावांनी पराभव करत त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. या पराभवानंतर विल्यमसन बोलत होता.
विल्यमसन म्हणाला की, 'दिल्लीचा संघ चांगला होता. ते लय प्राप्त करण्याच्या प्रयत्नात होते. त्यात ते यशस्वी ठरले. धावांचा पाठलाग करताना, धोका पत्करणे गरजेचे होते. अशात आमची सुरूवात खराब झाली. पण आमच्या मधल्या फळीतील फलंदाज भागिदारी रचण्यात यशस्वी ठरले. अखेरच्या काही षटकात सामना आमच्या हातातून निसटला.'
आयपीएलची अंतिम फेरी गाठता न येणे ही बाब आमच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. पण आमच्या संघाने मागील तीन आठवड्यात चांगली कामगिरी नोंदवली. याचा आम्हाला अभिमान आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला अनेक सामने आम्ही थोड्या फरकाने गमावले. आयपीएलमध्ये प्रत्येक संघ मजबूत आहेत. यामुळे चुकीला माफी नसते. आम्हाला लय प्राप्त करण्यासाठी वेळ लागला असल्याचेही विल्यमसनने सांगितले.
आमच्यासाठी तेरावा हंगाम चांगला राहिला. युवा आणि अनुभवी खेळाडू यांच्यात चांगला ताळमेळ होता. युवा खेळाडूंना अनेक संधी मिळाल्या. या संधी त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या आहेत, असेही विल्यमसनने सांगितले.