अहमदाबाद - टीम इंडियाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या इशान किशनने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पदार्पण केलं. या सामन्यात किशनने के. एल. राहुलसोबत सलामीला येत ३२ चेंडूंत ५६ धावा चोपल्या. यात त्याने ५ चौकार व ४ षटकार खेचले. सामना संपल्यानंतर किशनने मैदानावर घडलेला खास किस्सा सांगितला.
इंग्लंडविरुद्धचा सामना संपल्यानंतर युझवेंद्र चहलने इशानची मुलाखत घेतली. ही छोटीशी मुलाखत बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली आहे. यात चहलने, जेव्हा तुझे अर्धशतक झाले, तेव्हा आम्ही पाहिले की दोन-तीन सेकंद तू बॅटच उंचावली नव्हतीस. तुझे अर्धशतक झाले, हे तुला माहित नव्हते का? तू थोडा नर्व्हस झाला होतास का?, असा प्रश्न विचारला.
तेव्हा यावर उत्तर देताना इशान म्हणाला, माझे अर्धशतक झाले, हेच मला माहित नव्हते आणि जेव्हा विराट कोहली अभिनंदन करायला आला, तेव्हा मला ते समजलं. विराट भाई, मागून ओरडला, ओए चारही बाजूला फिर आणि बॅट दाखव. सर्वांना बॅट दाखव, तुझी ही पहिलीच मॅच आहे, असे सांगितल्याचे इशान म्हणाला.