मुंबई - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे चाहत्यांसह आजी-माजी खेळाडूंना धक्का बसला. कारण प्रत्येकाची इच्छा होती की, धोनीने निवृत्तीचा सामना खेळायला हवा. पण तसे घडले नाही. अनपेक्षित निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने अचानक निवृत्तीची घोषणा केली. आता निवृत्तीच्या सामन्यावरून माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपले मत व्यक्त केले आहे.
इरफान पठाणने एक ट्विट केले आहे. यात त्याने ११ खेळाडूंची नावे असलेला एक संघ निवडला आहे. तो संघ आहे, ज्या खेळाडूंना निवृत्तीचा सामना खेळता आलेला नाही अशा खेळाडूंचा. मागील काही वर्षांमध्ये भारताचे बरेच दिग्गज क्रिकेटचपटू निवृत्त झाले. पण माजी खेळाडू सचिन तेंडुलकर वगळता अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला निवृत्तीचा सामना खेळता आला नाही. विरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, गौतम गंभीर, झहीर खान या दिग्गजांना आपली निवृत्ती मैदानात घेता आली नव्हती. त्यामुळे ज्या खेळाडूंना निवृत्तीचा सामना खेळता आला नाही, त्यांच्यासाठी एक सामना खेळवावा, अशी इच्छा इरफानने जाहीर केली आहे.