नवी दिल्ली -आयपीएल -२०२० च्या लिलावात कोणत्याही संघाने विकत न घेतल्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने आपला मोठा भाऊ युसूफ पठाणचे सांत्वन केले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू मानल्या जाणार्या युसूफला आयपीएलच्या पुढील हंगामासाठी कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.
हेही वाचा -आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी 'हे' कांगारू ठरले नशीबवान!
'यासारख्या छोट्या घटना आपल्या कारकिर्दीचे वर्णन करू शकत नाहीत. तुमची कारकीर्द जबरदस्त आहे. आपण खरे 'मॅचविनर'आहात. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो लाला', असे इरफानने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. युसूफची बेस प्राईस एक कोटी रुपये होती. पण १७४ आयपीएल सामने खेळणार्या या खेळाडूला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. युसूफने आपल्या कारकीर्दीत २२४१ धावा केल्या असून त्याने ४२ बळीही घेतले आहेत.
आयपीएलच्या २०१० चा मोसम युसूफ पठाणसाठी खास ठरला होता. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱया युसूफ पठाणने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात ३७ चेंडूंत शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने ८ षटकार आणि ९ चौकार ठोकले होते. युसूफच्या या झंझावाती शतकानंतरही मुंबईने या सामन्यात ४ धावांनी विजय नोंदवला होता.