मुंबई - आयपीएलच्या १४व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने विजयी प्रारंभ केला. शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा ७ गडी राखून पराभव केला. दिल्लीच्या या विजयात पृथ्वी शॉ आणि डावखुरा शिखर धवन या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावत मोलाची भूमिका निभावली. शिखरचे हे आयपीएल करियरमधील ४२ वे अर्धशतक असून त्याने या खेळीदरम्यान एका विक्रमाला गवसणी घातली.
शिखरने आतापर्यंतच्या आयपीएल करिअरमध्ये ६०० चौकार मारले आहेत. शनिवारी ९वा चौकार मारताक्षणी त्याने आयपीएलमधले ६०० चौकाराचा टप्पा गाठला. शिखर सारखी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आलेली नाही. शिखर नंतर यादीत सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा नंबर येतो. त्याच्या नावे आयपीएलमध्ये ५१० चौकार आहेत.
डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ हजार २५४ धावांची नोंद आहे. तर धवनने वॉर्नरचा विक्रम मोडला आहे. आता शिखरच्या नावावर ५ हजार २८२ धावा आहेत. विराट कोहली आणि सुरेश रैना आता शिखर धवनच्या पुढे आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये ५ हजार ९११ धावा केल्या आहेत. तर रैनाने ५ हजार ४२२ धावा केल्या आहेत.