मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरूवात खराब झाली. त्यांना पहिल्या सामन्यात दिल्लीकडून ७ गडी राखून पराभव पत्कारावा लागला. या पराभवाचे खापर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजांवर फोडलं आहे.
सामना संपल्यानंतर बोलताना धोनी म्हणाला, वानखेडेच्या खेळपट्टीवर दव पडतो. त्यावर सगळे काही अवलंबून होते. फलंदाजी करताना आम्हाला ही बाब लक्षात आली होती. त्यामुळे आम्ही जास्त धावा करण्याची रणनिती आखली आणि फलंदाजांनी आपली भूमिका चोख पार पाडत १८८ धावसंख्या उभारल्या. दुसऱ्या डावात सुरुवातीला फलंदाजांना धावा करण्यात समस्या आल्या. मात्र दव पडल्यानंतर फलंदाजी करणे सोपे झाले.
आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. गोलंदाजांनी खेळपट्टी आणि मैदानाची परिस्थिती पाहून मारा केला नाही. त्यामुळे त्यांनी अधिक धावा मोजल्या. या पराभवातून आम्ही नक्कीच शिकलो आहोत, असेही धोनी म्हणाला.