मुंबई -आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाने कंबर कसली आहे. चेन्नईने नेट सरावासाठी खास अफगाणिस्तानवरुन गोलंदाज मागवला आहे.
चेन्नई संघाने अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज फजलहक फारूकी याची नेट गोलंदाज म्हणून निवड केली आहे. तो चेन्नईच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी भारतात पोहोचला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या संदर्भात ट्विट केले आहे. यात त्यांनी फजलहक फारूकी भारतासाठी रवाना झाल्याचे सांगितलं आहे.
चेन्नईने ९ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी बुधवारी (ता. २४) नवीन जर्सी लॉन्च केली. संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या हस्ते या जर्सीचे अनावरण करण्यात आले. चेन्नईने त्यांच्या जर्सीत भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून कॅमोफ्लॉजचा समावेश केला आहे.
दरम्यान, आयपीएलच्या मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे प्रदर्शन खराब ठरले. आयपीएल इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ बाद फेरी गाठू शकला नाही. त्यांना ७व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आता चेन्नईने चौदाव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. यात चेन्नईने सराव सत्राचे आयोजन करत खेळाडूंना एकत्रित केलं आहे.
हेही वाचा -एलिस पेरी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज
हेही वाचा -पुन्हा थरार.. भारत-पाक भिडणार, पाकिस्तान वृत्तपत्राचा दावा