दुबई - फलंदाजीचे मोठेपण, धावांचे सातत्य हे शास्त्रशुद्ध तंत्रावर बरेचसे अवलंबून असते. पण ऑस्ट्रेलियाचा स्टिव स्मिथ मात्र याला अपवाद ठरताना दिसतो. कारण तो मैदानात फलंदाजीदरम्यान, नेहमी अस्थिर वाटतो. तो एकदा सेट झाल्यानंतर इतका शफल होतो की, जवळपास ऑफस्टंपच्या पलीकडे जाऊन तो चेंडू टोलावतो. पाहणाऱ्याला तो कधीही पायचीत होईल असे वाटते. पण तो सहजतेने चेंडू टोलावतो. पुल, स्क्वेअर कट, ड्राइव्हज् या सर्व प्रकारचे फटके मारण्यात तो पारंगत आहे. आता तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा ट्रेडमार्क असलेला हॅलिकॉप्टर शॉट मारण्यातही पारंगत झाला आहे.
स्टिव स्मिथ आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थानने पहिल्याच सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला धूळ चारत विजयी सुरूवात केली. या सामन्यानंतर राजस्थान संघाने सराव सत्रात घाम गाळला. यात स्टिव स्मिथने हॅलिकॉप्टर शॉट मारताना दिसून आला. याआधी धोनी, हार्दिक पांड्या, राशिद खान हे खेळाडू हॅलिकॉप्टर शॉट मारताना पाहायला मिळाले आहेत. यात स्मिथचादेखील सामावेश झाला आहे.