दुबई - चेन्नई सुपर किंग्जने रविवारी झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा १० गडी राखून पराभव केला. सलग तीन पराभवानंतर चेन्नईने विजय साकारला. चेन्नईच्या विजयात फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी धमाकेदार अर्धशतकं झळकावली. त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर पंजाबने दिलेले १७८ धावांचे आव्हान चेन्नईने सहज पूर्ण केले. दरम्यान, या सामन्यात अनेक विक्रमाची नोंद झाली, वाचा कोणते आहेत ते विक्रम...
- फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन या दोघांनी सलामीला येत चेन्नईला मोठा विजय मिळवून दिला. या दोघांनी नाबाद १८१ धावांची भागिदारी केली. त्यांची ही भागिदारी सीएसकेकडून सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. याआधी मुरली विजय आणि माइक हसी या दोघांनी चेन्नईसाठी १५९ धावांची भागिदारी केली होती.
- डू प्लेसिस आणि वॉटसन यांनी केलेली भागिदारी पंजाबविरुद्धची सर्वात मोठी भागिदारी ठरली. याआधी कोणत्याही विकेटसाठी एवढी मोठी भागिदारी कोणालाही पंजाविरुद्ध करता आलेली नाही.
- डू-प्लेसिस आणि वॉटसन यांनी रचलेली भागिदारी, आयपीएलच्या इतिहासातील चौथी मोठी सलामीची भागिदारी ठरली आहे.
- आयपीएलच्या इतिहासात विनाविकेट कोणत्याही संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवलेला हा सर्वात मोठा दुसरा विजय आहे. विना विकेट सर्वात मोठे लक्ष्य गाठण्याचा विक्रम केकेआरच्या नावे आहे. केकेआरने २०१७ मध्ये गुजरात लॉयन्सविरुद्धच्या सामन्यात १८४ धावा केल्या होत्या.