मुंबई- आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा सलामीचा पहिला सामना १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अबुधाबी येथे होणार आहे. शनिवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिंलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी, आज (रविवार) वेळापत्रकाची घोषणा केली जाणार आहे, असे सांगितलं होतं. त्यानुसार, आज याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, यंदाचा हंगाम कोरोनामुळे युएईमध्ये खेळवला जात आहे. चाहत्यांमध्ये या हंगामाची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
आयपीएलचा १३ वा हंगाम ५३ दिवसांचा आहे. नव्या वेळापत्रकानुसार २४ सामने दुबई, २० सामने अबूधाबी आणि १२ सामने शारजाहमध्ये खेळवली जाणार आहेत. या स्पर्धेतील सायंकाळचे सामने भारतीय वेळेनुसार, ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील, तर डबल हेडरचे १० सामने दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरू होतील. दरम्यान, बीसीसीआयने साखळी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.