शारजाह - क्रिकेट इतिहासात २ चेंडूत २७ धावा झाल्याचे पाहायला मिळाले. हा कारनामा झाला, राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात. राजस्थानच्या जोफ्रा आर्चरने तुफानी फलंदाजी करत हा कारनामा केला.
घडले असे, की चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी डावाचे २०वे षटक टाकत होता. आतापर्यंत लुंगीने भेदक गोलंदाजी केली होती. पण त्याच्या २०व्या षटकात मात्र जोफ्रा आर्चरने त्याला चांगलेच धुतले. जोफ्राने या २० षटकात केलेल्या तुफानी फटकेबाजीमुळेच राजस्थानचा चेन्नईपुढे २१७ धावांचे आव्हान ठेवता आले.
लुंगीच्या २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जोफ्राने षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार वसूल केला, पण हा नो बॉल असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही जोफ्राने षटकार खेचला. हा चेंडूही नो बॉल होता. यानंतर गोलंदाज लुंगीने आणखी चेंडू टाकला. मात्र, त्या चेंडूला पचांनी वाईड घोषित केले. त्यामुळे जोफ्राने यावेळी फक्त दोन चेंडूत २७ धावा फटकावल्याचे पाहायला मिळाले.