दुबई - दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ५९ धावांनी पराभव झाला. विराट कोहली वगळता, आरसीबीच्या अन्य फलंदाजांनी दिल्लीच्या माऱ्यासमोर नांगी टाकली. यामुळे दिल्लीने केलेल्या १९६ धावांच्या प्रत्युत्तरात आरसीबीचा संघ १३७ धावाच करु शकला. दरम्यान, या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीकडून एक मोठी चूक घडलेली पाहायला मिळाली. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला आहे.
कर्णधार विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अनवधानाने चेंडूला लाळ लावली. पण त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपण आयसीसीच्या नियमाचे भंग केला आहे. तेव्हा त्याने पंचांची माफी मागितली.
दिल्लीच्या डावातील तिसऱ्या षटकात नवदीप सैनीच्या तिसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉने मारलेला फटका विराटने अडवला. चेंडू हातात आल्यानंतर विराटने त्याला लाळ लावली.
दरम्यान, कोरोनानंतर आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यात खेळाडू चेंडूला थुंकी किंवा लाळ लावू शकत नाही. पण विराट कोहलीकडून ही चूक मैदानात झाल्याचे पाहायला मिळाले.