शारजाह - आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ आपला तिसरा सामना खेळण्यासाठी आज मैदानात उतरेल. त्यांच्यासमोर राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान आहे. राजस्थानने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला होता. यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. तसेच या सामन्यात संजू सॅमसनने स्वप्नवत कामगिरी नोंदवली, तर जोस बटलर सज्ज झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सची फलंदाजी आणखी भक्कम झाली आहे. दुसरीकडे पंजाबने मागील सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वात आरसीबीचा तब्बल ९७ धावांनी धुव्वा उडवला आहे. त्यामुळे फॉर्मात असलेल्या संघात लढत होत असल्याने आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
IPL २०२० : किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान; कोण मारणार बाजी ? - Rajasthan Royals vs Kings XI punjab live
आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पंजाबने मिळवलेल्या दमदार विजयात केएल राहुलने शतकी खेळी केली होती. या सामन्यात त्याने सात षटकारांची आतिषबाजी करीत ६९ चेंडूंत नाबाद १३२ धावा केल्या. असे असले तरी, पंजाबचा स्फोटक खेळाडू ग्लेन मॅक्सवेल धावांसाठी झगडत आहे. पंजाबच्या गोलंदाजीची मदार प्रामुख्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलवर आहे.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघात जोस बटलर परतला आहे. त्याला विलगीकरणाच्या नियमामुळे पहिल्या सामन्याला मुकावे लागले होते. तो आज यशस्वी जैस्वालच्या साथीने डावाची सुरुवात करू शकतो. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत स्टिव्ह स्मिथ त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकेल. आज राजस्थान स्मिथ, बटलर, टॉम करन आणि जोफ्रा आर्चर या चार परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
- किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ -
- लोकेश राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, शेल्डन कॉटरेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), इशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णप्पा गौतम, हरप्रीत बरार, दीपक हुड्डा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवि बिश्नोई, सिमरन सिंह (यष्टीरक्षक), जगदीश सुचित, तजिंदर सिंह, हार्डस विलजोन
- राजस्थान रॉयल्सचा संघ -
- स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशेन थॉमस, अँड्रयू टाई, डेविड मिलर, टॉम करन, अनिरूद्ध जोशी, श्रेयस गोपाल, रियान पराग, वरूण आरोन, शशांक सिंह, अनुज रावत, महिपाल लोमरोर, मयांक मार्कंडेय.