शारजाह - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज डबल हेडरमध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. विस्फोटक फलंदाज व डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीचा अनुभव असल्याने, सनरायजर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचा संघ तगडा आहे. उभय संघातील सामन्याला दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होईल.
सनरायजर्सचा मुख्य वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी असल्याने त्याचा खेळण्याची शक्यता धुसरच आहे. सीएसकेवरील विजयाने हैदराबादचे मनोबल उंचावले आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे हे वादळी फलंदाजी करण्यात सक्षम आहेत. युवा अभिषेक शर्मा, प्रियम गर्ग आणि अब्दुल समद हे देखील चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. तर गोलंदाजीत राशिद खान आज हुकमी एक्का ठरू शकतो. भुवनेश्वर या सामन्याला मुकला तर, वेगवान टी. नटराजन, खलील अहमद यांच्यावर दडपण असेल.
दुसरीकडे मुंबईचा संघ हैदराबादच्या तुलनेत बलाढ्य वाटत आहे. कर्णधार रोहित शर्मा, केरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, इशान किशन सद्या लयीत आहेत. क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा संघाला आहे. अनुभवी जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन चांगला मारा करत आहेत. या अनुभवी वेगवान गोलंदाजांना फिरकीपटू राहुल चाहर आणि कृणाल पांड्या यांची चांगली साथ मिळत आहे.
शाहजाहचे मैदान लहान आहे. यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ विजयासह दोन गुणांची कमाई करण्यासाठी उत्सुक आहेत.