दुबई - मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात काल (सोमवार) दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये लढत झाली. अत्यंत चुरशीची ठरलेल्या लढतीत आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. या लढतीत मुंबई इंडियन्सला कर्णधार रोहित शर्माने केलेली चूक महागात पडली आणि मुंबईला पराभव स्वीकाराला लागला, असे म्हटलं जात आहे.
रोहितने कोणती चूक केली -
रोहित शर्माने ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्या षटकात एक चूक केली. त्याने आरसीबीचा स्फोटक फलंदाज अॅरोन फिंचचा झेल सोडला आणि हीच बाब मुंबईसाठी महागडी ठरली. फिंचने तिसऱ्या षटकातील चेंडू मिड विकेटला टोलवला होता. त्यावेळी रोहित तिथे उभा होता. तो हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण रोहितला हा झेल पकडता आला नाही आणि त्याने फिंचला जीवदान दिले.
फिंचने जीवदानाचा चांगलाच फायदा उचलला. कारण फिंचचा झेल जेव्हा रोहितने सोडला तेव्हा तो ९ धावांवर होता. जीवदान मिळाल्यानंतर फिंचने पुढच्याच चेंडूवर षटकार ठोकत आपले मनसुबे जाहिर केले. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५२ धावा केल्या. त्यामुळेच रोहितने सोडलेला झेल मुंबईला चांगलाच महागात पडल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, रोहित हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. पण आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून चूक झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीही झेल सोडल्याने टीकेचा धनी ठरला आहे. विराटने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलचे दोन झेल सोडले होते. या जीवदानाचा फायदा उचलत राहुलने शतक झळकावले होते.
RCB vs MI: बंगळुरूची 'विराट' कामगिरी; मुंबईला 'रॉयल' धक्का, गुणातालिकेतील बदल जाणून घ्या...
IPL २०२० : विराटची जादू ओसरली?, आकडेवारी पाहा आणि तुम्हीच ठरवा...