नवी दिल्ली -सलग पाच सामने जिंकलेल्या मुंबई इंडियन्ससमोर आज आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान असणार आहे. या सामन्यातील विजयामुळे मुंबई प्ले-ऑफच्या जवळ पोहोचेल. तर, एक पराभव पंजाबचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणू शकतो. सध्या पंजाबचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. हा सामना दुबई इंटरनॅशन स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
मजबूत फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीमुळे मुंबईचा संघ विरोधी संघांचे आव्हान पार करण्यास सक्षम ठरला आहे. शेवटच्या सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा आठ गडी राखून पराभव केला. मुंबईचा कर्णधार फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचा सलामीचा जोडीदार क्विंटन डी कॉक चांगल्या लयीत आहेत. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, इशान किशन हे फलंदाज चांगली धावसंख्या उभारण्याकडे लक्ष देतील. तर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड हे फलंदाज फिनिशरच्या भूमिकेत असतील.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजी म्हणून पुढे आले आहेत. त्यांनी आठ सामन्यांत प्रत्येकी १२ विकेट्स घेतल्या आहेत. फिरकी विभागात युवा राहुल चहरने प्रभावी गोलंदाजी केली.
दुसरीकडे, वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज गेल परतल्यामुळे पंजाबचा उत्साह वाढला आहे. गेलने पहिल्या सामन्यात ४५ चेंडूत ५३ धावा केल्या. त्यामध्ये पाच षटकारांचा समावेश होता. पंजाबला गोलंदाजांची समस्या आहे. मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई वगळता त्यांच्या कुठल्याही गोलंदाजाचा प्रभाव दिसून आलेला नाही. बर्याच पर्यायांचा विचार करूनही योग्य संतुलन साधण्यात पंजाबला अपयश आले आहे.