मुंबई - आयपीएल २०२०च्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. त्याच्या ३ षटकांत मुंबईच्या फलंदाजांनी तब्बल ४९ धावा वसूल केल्या. यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक केले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत १९ धावा देत एक गडी टिपला. कमिन्सच्या या कमबॅक कामगिरीचे कौतुक भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने केले आहे. युवा गोलंदाजांनी कमिन्सकडून कमबॅक कसे करावे, हे शिकावं, असा सल्ला त्याने दिला आहे.
युवराजने या संदर्भात ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, पॅट कमिन्सने दमदार कमबॅक केले. युवा गोलंदाजांनी कमबॅक कसे करावे, हे कमिन्सकडून शिकले पाहिजे. पहिल्या सामन्यात महागडा ठरल्यानंतर कमिन्सने आपल्या लयीत बदल करत हैदराबादच्या फलंदाजांना अडचणीत आणले.
आयपीएल २०२०साठी डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात सर्वाधित बोली पॅट कमिन्सवर लागली. केकेआरने त्याला तब्बल १५.५० कोटीं रुपये खर्चून आपल्या संघात घेतले. पण तो पहिल्या सामन्यात महागडा ठरला. यामुळे त्याच्यावर टीका होत होती. त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात दमदार कमबॅक करत टीकाकारांचे तोंड बंद केले.