अबुधाबी - आयपीएलच्या ३९व्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाताचा ८ गडी राखून धुव्वा उडवला. कोलकाताच्या ८५ धावांचे आव्हान बंगळुरूने १३.३ षटकांतच पूर्ण केले. बंगळुरूचे सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि अॅरोन फिंच यांनी ४६ धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट कोहली (१८) आणि गुरकीरत मान (२१) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकाताच्या फलंदाजांना नामोहरम करणारा मोहम्मद सिराज या सामन्याचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी, मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी आणि इतर गोलंदाजानी दिलेल्या योगदानामुळे बंगळुरूने कोलकाताला ८४ धावांवर रोखले. या धावा जमवताना कोलकाताने आपले ८ गडी गमावले. मोहम्मद सिराजने सुरुवातीची दोन षटके निर्धाव टाकत राहुल त्रिपाठी (१), नितीश राणा (०), टॉम बँटन (१०) या फलंदाजांना तंबूत पाठवले. आयपीएलच्या इतिहासात दोन षटके निर्धाव टाकणारा सिराज पहिलाच गोलंदाज ठरला. नाणेफेक जिंकून कोलकाताचा फलंदाजीचा निर्णय अंगउलट आला. कर्णधार इयान मॉर्गन वगळता एकाही फलंदाजाला योग्य कामगिरी करता आलेली नाही. मॉर्गनच्या ३० धावांच्या खेळीमुळे कोलकाताला शंभर धावांच्या जवळ पोहोचता आले. शेवटच्या षटकात कुलदीप यादव १२ धावांवर धावबाद झाला. तर, लॉकी फर्ग्युसन १९ धावांवर नाबाद राहिला. बंगळुरूकडून सिराजने चार षटकात ८ धावा देत ३ बळी मिळवले. तर, युझवेंद्र चहलला २, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक बळी घेता आला.
MATCH UPDATE :
- बंगळुरूचा कोलकातावर ८ गडी राखून विजय.
- विराट १७ तर, गुरकीरत २१ धावांवर नाबाद.
- दहा षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद ६३ धावा.
- सात षटकानंतर बंगळुरूच्या २ बाद ४६ धावा.
- विराट-गुरकीरत मैदानात.
- फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर फिंच झेलबाद, तर पडीक्कल धावबाद.
- बंगळुरूचे दोन्ही सलामीवीर बाद.
- पाच षटकात बंगळुरूच्या बिनबाद ३७ धावा.
- पहिल्या षटकात बंगळुरूच्या बिनबाद ७ धावा.
- पॅट कमिन्स टाकतोय कोलकातासाठी पहिले षटक.
- बंगळुरूचे सलामीवीर मैदानात.
- २० षटकात कोलकाताच्या ८ बाद ८४ धावा.
- शेवटच्या षटकात कुलदीप धावबाद.
- १९ षटकानंतर कोलकाताच्या ७ बाद ७४ धावा.
- लॉकी फर्ग्युसन मैदानात.
- कर्णधार मॉर्गन ३० धावांवर बाद. खेळीत ३ चौकार आणि एक षटकार.
- पंधरा षटकात कोलकाताच्या ६ बाद ५२ धावा.
- कुलदीप मैदानात.
- कोलकाताचा सहावा गडी बाद, कमिन्स चहलच्या गोलंदाजीवर माघारी.
- दहा षटकानंतर कोलकाताच्या ५ बाद ३६ धावा.
- अवघ्या ३२ धावांत कोलकाताचा अर्धा संघ गारद.
- पॅट कमिन्स मैदानात.
- कोलकाताचा अर्ध संघ तंबूत, कार्तिक ४ धावांवर बाद.
- यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाताची पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावसंख्या. (४ बाद १७)
- आयपीएलमध्ये दोन षटके निर्धाव टाकणारा मोहम्मद सिराज पहिलाच गोलंदाज.
- पाच षटकात कोलकाताच्या ४ बाद १५ धावा.
- कोलकाताचा कर्णधार इयान मॉर्गन मैदानात.
- सिराजचा तिसरा बळी, बँटन १० धावांवर माघारी.
- दिनेश कार्तिक मैदानात.
- सैनीच्या गोलंदाजीवर गिल एका धावेवर झेलबाद.
- कोलकाताची घसरगुंडी, शुबमन गिल बाद.
- मोहम्मद सिराजचे निर्धाव षटक.
- टॉम बँटन मैदानात.
- सिराजचा धमाका, नितीशा राणाचा शून्यावर उडवला त्रिफळा.
- नितीश राणा मैदानात.
- कोलकाताला पहिला धक्का, सिराजच्या गोलंदाजीवर त्रिपाठी बाद.
- पहिल्या षटकात कोलकाताच्या बिनबाद ९ धावा.
- ख्रिस मॉरिस टाकतोय बंगळुरूसाठी पहिले षटक.
- कोलकाताचे सलामीवीर राहुल त्रिपाठी-शुबमन गिल मैदानात.
- नाणेफेक जिंकून कोलकाताचा फलंदाजीचा निर्णय.
- थोड्याच वेळात होणार नाणेफेक.