मुंबई - आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्याने धावा करूनही सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. निवडकर्त्यांनी सूर्यकुमारकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप अनेक दिग्गज खेळाडूंनी केला आहे. या विषयावरून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने निवडकर्त्यांवर निशाणा साधला आहे.
बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावा करत मुंबईला सामना जिंकून दिला. या सामन्यानंतर हरभजनने सूर्यकुमारचे कौतुक करत निवडकर्त्यांवर निशाणा साधला. सूर्यकुमारच्या तडाकेबंद अर्धशतकी खेळीनंतर हरभजनने ट्विट केले आहे. सूर्यकुमारने चांगली खेळी खेळला. निवडकर्त्यांनी त्याची ही खेळी पहिली असावी, ही अपेक्षा, असे हरभजनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड न केल्यामुळे हरभजनने याआधी निवड समितीला फटकारले आहे. संघात निवड होण्यासाठी सूर्यकुमारने आणखी काय करायला पाहिजे, हे मला माहित नाही. रणजी करडंक आणि आयपीएलमध्ये तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मला वाटते भिन्न लोकांसाठी भिन्न नियम आहेत, अशा शब्दात हरभजनने निवड समितीला सुनावले होते.