आबुधाबी - आयपीएल २०२० मध्ये मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. ही लढत हैदराबादने १५ धावांनी जिंकली. हैदराबादच्या १८ वर्षीय खेळाडूने ठोकलेल्या षटकारांची चर्चा आता रंगली आहे. अब्दुल समद असे त्या खेळाडूचे नाव असून तो काश्मीरचा रहिवाशी आहे.
अब्दुल समदला हैदराबादने २० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात घेतले आहे. त्याने आयपीएलमध्ये पहिला सामना दिल्लीविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने फलंदाजीदरम्यान ७ चेंडूत १ चौकार आणि एक षटकारासह नाबाद १२ धावा केल्या. समदने मारलेला षटकार अतिशय खास ठरला.
दिल्लीचा एनरिक नॉर्ये १९ व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकत होता, त्यावेळी समदने त्याला तब्बल ८६ मीटर लांब षटकार खेचला आणि साऱ्यांनाच अवाक केले. समादच्या षटकारावर इरफान पठाण, हर्षा भोगले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील समदचे ट्विट करत कौतूक केले आहे.
समदने २०१९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १० प्रथम श्रेणी सामन्यात ११२च्या स्टाइक रेटसह ५९२ धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. समद लेग स्पिन गोलंदाजीही करतो.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना जॉनी बेअरस्टो (५३), डेव्हिड वॉर्नर (४५) आणि केन विल्यमसन (४१) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर १६२ धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरादाखल दिल्लीचा संघ निर्धारीत २० षटकांत ७ बाद १४७ धावा करु शकला. राशिद खानने ४ षटकात १४ धावा देत ३ गडी टिपले. भुवनेश्वर कुमारने २ तर खलील अहमद आणि टी नटरराजन यांनी १-१ गडी बाद करत चांगली साथ दिली.