शारजाह - मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ पॉवर प्लेमध्येच पराभूत झाला होता, अशी प्रतिक्रिया चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन प्लेमिंग यांनी दिली. काल, शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा १० गडी राखून दारूण पराभव केला. या पराभवानंतर चेन्नई संघावर टीका होता आहे.
सामना संपल्यानंतर प्लेमिंगने सांगितले की, पॉवर प्लेमध्येचे चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला होता. यानंतर आमच्याकडे करण्यासाठी काही शिल्लक राहिलेले नव्हते. खरे सांगायचे झाल्यास, आम्ही त्यामुळे स्तब्ध झालो होतो. हा पॉवर प्ले आमच्यासाठी सर्वात वाईट होता. आमच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या आणि सगळं संपलं.
चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. एकवेळ चेन्नईची अवस्था ६ बाद ३० अशी झाली. यानंतर सॅम करनने ४७ चेंडूत ५२ धावांची खेळी करत चेन्नईला शंभरी गाठून दिली. चेन्नईचा संघ २० षटकांत ९ बाद ११४ धावा करू शकला. प्रत्युत्तरादाखल मुंबईने हा सामना इशान किशनच्या नाबाद ६८ धावा आणि क्विंटन डी कॉकच्या नाबाद ४६ धावांच्या जोरावर आरामात जिंकला.