आबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभव पत्कारावा लागला. महत्वाच्या क्षणी फलंदाजांनी विकेट फेकल्याने चेन्नईवर पराभवाची नामुष्की ओढवली. कोलकाताने हा सामना १० धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतर धोनीने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले.
पराभवानंतर बोलताना धोनी म्हणाला, 'मधल्या षटकांमध्ये केकेआरच्या गोलंदाजांनी २-३ षटके चांगली गोलंदाजी केली. या दरम्यान, आम्ही लागोपाठ २-३ विकेट गमावल्या. जर त्या षटकात आम्ही सांभाळून फलंदाजी केली असती तर कदाचीत निकाल वेगळा लागला असता.'
पुढे गोलंदाजीविषयी धोनी म्हणाला, नवीन चेंडू असताना आम्ही खूप धावा दिल्या. पण मधल्या आणि शेवटच्या काही षटकात कर्ण शर्मा, सॅम करन यांनी सुरेख गोलंदाजी केली. कोलकाताने दिलेले हे आव्हान आम्ही सहज पूर्ण करायला हवे होते. परंतू आमच्या फलंदाजांनी, गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर पाणी फिरवले. अशा शब्दात धोनीने सामना संपल्यानंतर आपली नाराजी व्यक्त केली.