कोलकाता- इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) २०२० मधील हंगामासाठी आज खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. कोलकातामध्ये होणाऱ्या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने 'शॉर्टलिस्ट' केले होते. मात्र, आता या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागणार आहे. नव्याने यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या ६ खेळाडूत चार भारतीय तर दोन विदेशी आहेत. ३३८ मधील फक्त ७३ खेळाडूंचाच लिलाव होणार आहे, कारण सगळ्या ८ संघाकडे फक्त ७३ खेळाडू घेऊ शकतील, एवढाच कोटा आहे.
आयपीएल लिलाव प्रक्रियेला आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होईल. यावेळी फ्रँचायझींना १४ वर्षांपासून ते ४८ वर्षापर्यंतच्या खेळाडूवर बोली लावता येणार आहे. अफगानिस्तानच्या नूर अहमद १४ वर्षांचा असून भारताचा प्रवीण तांबे ४८ वर्षांचा आहे.
मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाकडे या लिलावासाठी सर्वात कमी पैसा शिल्लक राहिला आहे. मुंबई संघाने सर्वाधिक चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तर याउटल आतापर्यंत स्पर्धेचे एकदाही विजेतेपद न मिळवणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबकडे लिलावात बोली लावण्यासाठी सर्वाधिक पैसा आहे.