चेन्नई - चेपॉक मैदानावर झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेजर्स बंगळुरु संघाचा दारुण पराभव केला. रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना १७.१ षटकात सर्वबाद ७० धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईच्या संघाने हे सोपे आव्हान १७.४ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. सीएसकेच्या संघाने पहिल्याच सामन्यात ७ गडी राखून विजयी सलामी दिली.
चेन्नई सुपरकिंग्जची विजयी सलामी, रॉयल चॅलेजर्स बंगळुरु संघाचा दारुण पराभव
पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा विश्वास सार्थ करत सीएसकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. हरभजन सिंग, इम्राम ताहिर आणि रविंद्र जाडेजा यांच्या फिरकी पुढे बंगळुरूच्या संघाची तारांबळ उडाली. हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले तर जाडेजाला २ गडी बाद करता आले. बंगळुरूच्या संघातील अनुभवी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्यानंतर एकाही खेळाडूला दुहेरी आकडा पार करता आला नाही.
७१ धावांचे सोपे आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरुवात निराशाजनक राहिली. शेन वॉटसन भोपळाही फोडता आला नाही. तो चहलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. सुरेश रैनाने १९ धावांची भर घातली. अंबाती रायुडूने २८ धावाचे योगदान देऊन सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. केदार जाधव (१३) आणि रवींद्र जाडेजा(६) यांनी अधिक पडझड न होऊ देता संघाला पहिला विजय मिळवून दिला.