चेन्नई - झटपट क्रिकेटमधील जगात सर्वात जास्त चर्चेत असलेली लीग म्हणजेच आयपीएल. या लीगच्या १२ व्या पर्वास शनिवारपासून सुरुवात होत आहे. सलामीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू या संघात रंगणार आहे. महेंद्रसिंह धोनीचा संघ गतविजेता असून यंदा किताब राखण्याचे दडपण त्यांच्याकडे असेल. यंदा चौथ्यांदा चॅम्पियन होण्याकडे त्यांची नजर असेल.
चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि शेन वॉटसन ही सलामी जोडी यंदा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सलामीचा फलंदाज अंबातीने चांगलाच धमाका केला होता. त्याने लीगमध्ये ६०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. दुसरीकडे अष्टपैलू शेन वॉटसनही फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत ९३ गडी बाद केले आहेत.
मधल्या फळीत सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी आणि सॅम बिलिंग्स सारखे दमदार खेळाडू आहेत. मध्यल्या फळीत खेळणारे आयपीएलमधील हे सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. धोनीच्या नावावर ४ हजार ९८५ धावा जमा आहेत. तो एक उत्कृष्ठ फिनशर म्हणून ओळखला जातो.
केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो आणि रविंद्र जडेजासारखे प्रतिभावान खेळाडू कोणत्याही क्षणी बाजी पलटू शकतात. ड्वेन ब्राव्हो मोठ-मोठे फटके मारण्यात माहीर आहे. तसेच महत्त्वाच्या क्षणी बळी घेऊन संघास मदत करणे ही त्याची ख्याती आहे. रवींद्र जाडेजा हा उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजीत त्याने नेहमीच छाप सोडली आहे.
दीपक चाहर, इम्रान ताहिर आणि मोहित शर्मा या तिघांच्या खांद्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल. चेन्नईने मोहीत शर्मावर सर्वाधिक बोली लावली आहे. त्याला ५ कोटीली विकत घेतले. त्याने आतापर्यंत ८४ सामन्यात ९० बळी घेतले. त्याच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.