दुबई -चेन्नई सुपर किंग्ज टीममधील तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाचवेळी इतक्या लोकांना लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आयपीएल-२०२० ला केवळ २२ दिवस बाकी असतानाच ही घटना समोर आल्याने क्रिकेट वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयपीएलला गेलेल्या टीमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण टीमला क्वारंटाइन करण्यात आले आहे. चेन्नईमधील एका कॅम्पदरम्यान या सर्वांना लागण झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती आहे. २१ ऑगस्ट रोजी चेन्नई सुपर किंग्ज टीम दुबईला दाखल झाली होती. यानंतर त्यांनी ६ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला. २८ ऑगस्टपासून प्रशिक्षणाला सुरुवात होणार होती. या घटनेमुळे सर्व खेळाडुंना क्वारंटाइन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची सुरुवात १ सप्टेंबारपासून होणार असल्याची माहिती आहे. दुबईला दाखल झालेल्या इतर टीमच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज अद्यापही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहे.