नवी दिल्ली -२००० ते २०१४पर्यंत भारताच्या वेगवान गोलंदाजीचा ताफा सांभाळणाऱ्या झहीर खानचा आज ४२वा वाढदिवस आहे. 'झॅक' असे टोपणनाव असलेल्या झहीरचा महाराष्ट्रातील श्रीरामपूर येथे ७ ऑक्टोबर १९७८ला झहीरचा जन्म झाला. झहिरने २०००ला केनिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
झहीरच्या वडिलांनी क्रिकेटमध्ये येण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले. त्यांनीच झहीरला अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून क्रिकेटला प्राधान्य देण्यास सांगितले होते. त्यानंतर झहीर मुंबईमध्ये ज्युनियर क्रिकेट खेळू लागला. तिथे चांगले प्रदर्शन केल्यानंतर, त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बडोदा संघाकडून संधी मिळाली. २०००-०१मध्ये रेल्वेविरुद्ध खेळलेल्या रणजी सामन्यात त्याने १४५ धावांमध्ये ८ बळी घेत सामनावीराचा मान पटकावला होता.