मुंबई - पांढर्या कपड्यांमध्ये क्रिकेट खेळण्यासारखे दुसरे काही नाही, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. विराटने कसोटी क्रिकेटविषयी आपले प्रेम व्यक्त केले. देशासाठी कसोटी क्रिकेट खेळणे हे भाग्याचे असल्याचेही तो म्हणाला.
विराटने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये आपली भावना व्यक्त केली. त्याने कसोटीत फलंदाजी करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ''भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे हा एक विशेषाधिकार आहे", असे सांगितले.
कोहलीची गणना महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आतापर्यंत 86 कसोटी सामन्यांत 7240 धावा केल्या असून त्यामध्ये 27 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. याशिवाय त्याने भारताकडून 248 एकदिवसीय आणि 82 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 11867 आणि 2794 धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्स यांच्यात बरेच साम्य असल्याचे सांगितले आहे. दोघांचीही फलंदाजीची शैली समान आहे आणि यामुळेच ते वेगळे आहेत, असे ते म्हणाले.
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद आहे. लॉकडाऊनमध्ये आता सरकारने थोडी सवलत दिल्याने खेळाडू सराव करण्यास परतले आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. येथे उभय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळतील.