मेलबर्न - सिडनीमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघातील खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे बीसीसीआयसह भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि नवदीप सैनी मेलबर्नमधील रेस्तराँमध्ये कोरोनासंबंधित नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळाले. यानंतर वाद निर्माण झाला होता. यामुळे भारतीय संघाला कोरोना संकटाचा सामना करावा लागतो का काय? अशी शंका निर्माण झाली होती.
काय आहे प्रकरण -
कोरोनामुळे कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. यात खेळाडूंना बायो बबल मधून बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अशात रोहित, शुभमन, पंत, सैनी आणि शॉ हे पाचही जण एका रेस्तराँमध्ये जेवणास गेले. तिथे नवदीप सिंग नावाच्या चाहत्याने, त्याचे बील भरले आणि ट्विटरवर खेळाडूंसोबतची चित्रफित टाकली. यानंतर वादाला सुरूवात झाली.
'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने या प्रकरणाची चौकशी चालू करून त्या पाच खेळाडूंना संघापासून वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याची चौकशी करीत असल्याचे घोषित केले. यादरम्यान, खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ऑस्ट्रेलियामधील मीडियाने भारतीय संघाला लक्ष्य केले. पण आता सर्व खेळाडूंचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.