मुंबई - जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज आपल्या कारकिर्दीची १५ वर्षे पूर्ण केली. धोनीने २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. मात्र, त्यानंतर क्रिकेटप्रति निष्ठा आणि मेहनतीच्या जोरावर धोनीने स्वत:ला सिद्ध केले.
हेही वाचा -IPL २०२० : ४८ वर्षीय प्रविण तांबेचे आयपीएल स्वप्न भंगणार
एक उत्कृष्ट कर्णधार, वेगवान यष्टीरक्षक आणि क्रिकेटच्या दुनियेतील 'चाणक्य' अशी धोनीची ओळख आहे. १९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर, २०११ मध्ये तब्बल २८ वर्षांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वकरंडक उंचावला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने मारलेला अफलातून षटकार आणि रवी शास्त्री यांचे 'धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल, इंडिया लिफ्ट द वर्ल्डकप' हे समालोचन आजही लोंकाना फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाते.