नवी दिल्ली - २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व हे राहुल द्रविडच्या हातात होते. ही विश्वचषक स्पर्धा भारतीय क्रिकेट आणि चाहत्यांसाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. या स्पर्धेत भारत आपल्या गटात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध धक्कादायकरित्या पराभूत होऊन विश्वचषकातून बाहेर पडला होता. या विश्वचषक स्पर्धेत भारतासारखा मोठा संघ सुपर ८ चा टप्पाही पार करू शकला नव्हता. भारतीय क्रिकेट संघाचा हा लाजिरवाणा पराभव भारतीय चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.
संपूर्ण देशात भारताच्या संघाविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला होता. जागोजागी खेळाडूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जात होते. त्यामुळे वेस्ट इंडीजवरुन दिल्ली एयरपोर्टवर आलेल्या भारतीय खेळाडूंना घरी पोहचणेही मुश्कील झाले होते. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर येऊन भारतीय संघाचा विरोध करू लागले होते. परिस्थिती एवढी गंभीर झाली होती की, खेळाडूंच्या सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागली होती.