सिडनी - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय गोलंदाजांकडून ज्या प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा केली जात होती, ती पहिल्या एकदिवसीय सामन्यात पूर्ण झाली नाही. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुमार कामगिरी नोंदवत नकोसे विक्रम नोंदवले. ऑस्ट्रेलियन फलंदाज प्रत्येक भारतीय गोलंदाजावर वरचढ ठरले. भारताच्या चार गोलंदाजांनी प्रत्येकी ६० पेक्षा जास्त धावा बहाल केल्या.
भारतीय गोलंदाजांची दुसरी वेळ
नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल यांनी आपल्या १० षटकांत ६० पेक्षा जास्त धावा दिल्या. अशी कामगिरी नोंदवण्याची भारताची ही दुसरी वेळ ठरली. १० षटकांत ५९ धावा देऊन मोहम्मद शमी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. चहलने १० षटकांत ८९ धावा दिल्या आणि फक्त एक गडी बाद केला. बुमराहने १० षटकांत ७३ धावा देऊन एक गडी बाद केला. नवदीप सैनीनेही १० षटकांत ८३ धावा दिल्या. यापूर्वी २०१८ मध्ये, भारताच्या चार गोलंदाजांनी गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या १० षटकांमध्ये ६०पेक्षा जास्त धावा दिल्या होत्या.
चहलचा विक्रम आणि ऑस्ट्रेलियाचा डोंगर -
या कामगिरीनंतर चहल एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा देणारा फिरकीपटू ठरला आहे. चहलच्या अगोदर हा विक्रम लेगस्पिनर पीयूष चावलाच्या नावावर होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ बाद ३७४ धावा केल्या. त्यांची ही एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सर्वाधिक ३५९ धावा केल्या आहेत.