नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आज मंगळवारी भारत-पाकिस्तान लढत खेळवण्यात येत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर, पाकिस्तानने अफगाणिस्तानला नमवले. या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -जोकोविच अव्वलस्थानी...२१ वर्षीय सोफियाने मिळवले सातवे स्थान
या स्पर्धेच्या प्रवासात भारताने आतापर्यंत श्रीलंका, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमकुवत सुरुवात झाल्यानंतरही भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांनी २३३ धावसंख्या गाठली होती. यानंतर कार्तिक त्यागी आणि आकाश सिंगच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला अवघ्या १५९ धावांवर रोखता आले.
हा सामना पॉशफेस्ट्रमच्या मैदानावर खेळवला जात आहे. एकंदरीत हवामान स्वच्छ राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत नऊ सामने झाले असून पाकिस्तानने पाच, तर भारताने चार सामन्यांत विजय मिळवला आहे.