फ्लोरिडा- येथे भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघामध्ये रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पावसाच्या व्यत्ययानंतर भारताने 22 धावंनी विजय मिळवत मालिका खिशात घातली आहे.
या सामन्यात भारताने विंडिजसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजने 15.3 षटकांत 98 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबविण्यात आले. शेवटी डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने 22 धावांनी बाजी मारली.
रोहित शर्माच्या ६७, कर्णधार कोहली २८, शिखर २३ आणि पांड्याच्या २० धावांच्या जोरावर भारताने निर्धारीत २० षटकात १६७ धावा जमवल्या होत्या. प्रत्युत्तरात विंडिजकडून १६८ धावांसाठी पाठलाग करताना पॉवलने अर्धशतक पूर्ण करत 54 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला, त्यावेळी कायरन पोलार्ड आणि शॉमरॉन हटमोयर खेळत होते.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार कोहलीचा हा निर्णय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने सार्थ ठरवला. दोघांनी ७.५ षटकांत ६७ धावांचा पाया रचला. त्यानंतर शिखर धवन व्यक्तीगत २३ धावांवर बाद झाला. एकीकडून रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. कर्णधार कोहली आणि रोहितची जोडी जमलेली असताना रोहित शर्मा व्यक्तीगत ६७ धावांवर बाद झाला. मैदानात आलेला ऋषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. तो अवघ्या ४ धावांची भर टाकत बाद झाला. त्यापाठोपाठ कोहलीही २८ धावांवर बाद झाला. तेव्हा मनीष पांडेही ६ धावांची भर टाकत तंबूत परतला. कृणाल पांड्या आणि रविंद्र जडेजाने अनुक्रमे २० आणि ९ धावा करत संघाला १६७ धावांपर्यंत पोहचवले.