विशाखापट्टणम- वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला विजयी सुरूवात करता आली नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना विंडीजने ८ गडी राखून जिंकला. दरम्यान, आज उभय संघात दुसरा सामना विशाखापट्टणम येथे रंगणार आहे. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरीत साधण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विंडीजचा संघ मालिका विजयाच्या दृष्टीने मैदानात उतरेल.
पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची विंडीज फलंदाजांनी चांगली धुलाई केली. शेमरॉन हेटमायर आणि शाय होप यांनी दुसऱ्या गडीसाठी द्विशतकी भागिदारी करत भारताला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाडीची कामगिरी सुधारावी लागणार आहे.
विशाखापट्टणम येथील हवामान -
आज सकाळपासून विशाखापट्टणम येथे ढगाळ वातावरण आहे. मात्र, पावसाची शक्यता फक्त ७ टक्के असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दिवसभरातील कमाल तापमान २७ अंश सेल्सीयस राहिल, असा अंदाज आहे.