गुवाहाटी - भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेला उद्यापासून (रविवार) सुरूवात होणार आहे. उभय संघातील पहिला सामना गुवाहाटीच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. मात्र, या सामन्याआधी गुवाहाटीमध्ये नागरिकत्व कायद्यामुळे (CAA) तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मैदानामध्ये बॅनर किंवा पोस्टर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याची माहिती आसाम क्रिकेट असोसिएशनने दिली.
सामन्यादरम्यान चौकार आणि षटकारच्या प्ले कार्ड ऐवजी पेपरवर वापरण्यात येणाऱ्या मार्करवरही बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा नागरिकत्व कायद्याच्या विरोधाशी कोणताही संबंध नाही. हा निर्णय फक्त सुरक्षेचा विचार करून घेण्यात आला आहे, असे गुवाहाटी पोलीस आयुक्तांनी सांगितले.
हा नियम सर्वांसाठी लागू करण्यात आला आहे. तसेच हा एक आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे या सामन्यात उच्च स्तराची सुरक्षा देण्यात येणार आहे. आसाम असोसिएशनच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने विविध खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून स्टेडियमवरील खेळाडू, प्रेक्षक आणि इतर व्यक्तीसाठी काही नियम करण्यात आले आहेत.