नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी, खराब फॉर्माशी झगडत असलेल्या लोकेश राहुल याला डच्चू देत निवड समितीने रोहित शर्माची निवड केली. रोहित राहुलच्या जागेवर सलामीला येणार हे जवळपास निश्चित आहे. तत्पूर्वी आफ्रिकेचा संघ आणि अध्यक्षीय संघामध्ये एक सराव सामना खेळण्यात येत आहे. यात अध्यक्षीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. रोहित शर्मा या सामन्यात सलामीला आला आणि फक्त दोन चेंडूचा सामना करुन तो भोपळाही न फोडता माघारी परतला. यामुळे रोहितचे शतक १०० धावांनी हुकले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात अध्यक्षीय एकादश संघ मैदानात उतरला ठरल्याप्रमाणे रोहितने सलामी केली. मात्र, अवघ्या दोन चेंडूंचा सामना करून रोहित भोपळाही न फोडता माघारी परतला. तीन दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला.
हेही वाचा -इंग्लंडची महिला क्रिकेटपटू सारा टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
दुसऱ्या दिवसात फॅफ ड्यु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एडन मार्कराम (१००), टेंबा बवुमा (नाबाद ८७) आणि वेर्नोन फिलेंडर (४८) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर आफ्रिकेने ६ बाद २७९ धावांत डाव घोषित केला. धमेंद्रसिंग जडेजाने ३६ धावांमध्ये तीन गडी बाद केले.
आज (शनिवार) तिसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात रोहितच्या रुपाने धक्का बसला. रोहित आणि मयांक अग्रवाल हे सलामीला आले. सलामीवीर म्हणून कसोटीत रोहितची कामगिरी कशी होते याची उत्सुकता होती. पण, दुसऱ्या षटकात फिलेंडरने रोहितला क्लासेनकरवी झेलबाद केले.
दरम्यान, लोकेश राहुलला कसोटी संघातून डच्चू मिळाल्यानंतर रोहितला सलामीची संधी मिळणार, असे बोलले जात आहे. एकदिवसीय आणि टी-२० सामने आणि कसोटी यात खूप फरक असल्याने रोहितवर दडपण असेल, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, सराव सामन्याच्या पहिल्या संधीमध्ये रोहित शर्मा सलामीला 'फेल' ठरला आहे.
हेही वाचा -सचिन खेळतोय चक्क पाण्यात क्रिकेट..पाहा व्हिडिओ