मँचेस्टर- भारत-न्यूझीलंडदरम्यानची वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य लढत रंगतदार अवस्थेत असताना पावसाचे आगमन झाले. या वेळी भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून न्यूझीलंडला 46.1 षटकांत 5 बाद 211 धावांत रोखले होते. यानंतर रात्री उशिरापर्यंत लढत सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे मंगळवारचा खेळ स्थगित करून उर्वरित खेळ राखीव दिवशी म्हणजे आज होणार असल्याचे पंचांनी जाहीर केले.
दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर मार्टीन गप्टील अवघ्या एका धावेवर माघारी परतला. जसप्रीत बुमरहाने त्याचा बळी घेतला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविंद्र जाडेजाने हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली.