चेन्नई - भारताविरुद्ध कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच पाहुण्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो पुढील दोन कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅवली याने पहिल्या दोन कसोटीमधून माघार घेतली आहे. क्रॅवली चेंजिंग रुमबाहेर घसरून पडला. यात त्याला दुखापत झाली आणि त्याने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली.
२३ वर्षीय खेळाडूच्या उजव्या मनगटाला दुखापत झाल्याची माहिती इंग्ंलंड बोर्डाने दिली. या संदर्भात इंग्लंड बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. 'क्रॅवली याचा बुधवारी स्कॅन करण्यात आला त्यात त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला पहिल्या दोन कसोटी सामन्यांतून माघार घ्यावी लागत आहे. ड्रेसिंग रुमबाहेरील मार्बल फ्लोअरवर त्याचा पाय घसरला आणि ही दुखापत झाली, असे इंग्लंड बोर्डाने म्हटलं आहे.
दरम्यान, ओली पोपचा संघात समावेश करण्यात आला आहे. २३ वर्षीय पोपने मागील दोन दिवस संघासोबत कसून सराव केला. ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पोपला दुखापत झाली होती. यामुळे तो क्रिकेटपासून दूर होता. तो यातून सावरला असून इंग्लंड संघात परतण्यासाठी सज्ज आहे.