अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आजपासून सुरूवात झाली आहे. हा सामना गुलाबी चेंडूवर डे-नाईट पद्धतीने खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने पहिल्या सत्रात वर्चस्व राखले. इंग्लंडची अवस्था चहापानापर्यंत २७ षटकात ४ बाद ८१ अशी झाली आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार रूटचा हा निर्णय अंगलट आला. आपला १००वा सामना खेळणारा इशांत शर्मा याने इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्लीला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर जॉनी बेअरस्टो मैदानात आला. त्याला अक्षर पटेलने शून्यावर माघारी धाडले.
इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसल्याने भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला. पण त्यानंतर कर्णधार जो रूट आणि जॅक क्रॉली या दोघांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरला. सलामीवीर जॅक क्रॉलीने शानदार अर्धशतक केले. यानंतर अश्विनने कर्णधार जो रूटला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. रुटने १७ धावा केल्या. रुट पाठोपाठ क्रॉली देखील बाद झाला. ५३ धावांवर अक्षर पटेल याने त्याला पायचित केलं.
- भारतीय संघ -
- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
- इंग्लंडचा संघ -
- डोमिनिक सिब्ली, जॅक क्रॉउली, जॉनी बेयरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स (यष्टीरक्षक), जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.
हेही वाचा -IND vs ENG : नरेंद्र मोदी स्टेडियम सुविधांनी आहे सुसज्ज
हेही वाचा -सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलले, आता नरेंद्र मोदी स्टेडियम हे नवे नाव