चेन्नई - भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेटचा टप्पा गाठला. असा पराक्रम करणारा इशांत भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. इशांतच्या या कामगिरीचे आयसीसी आणि बीसीसीआयने अभिनंदन केलं आहे. याशिवाय भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने ३०० या हॉलिवूडपटाचे पोस्टर पोस्ट करत इशांतचे अभिनंदन केले आहे.
इशांतने इंग्लंडविरोधात चेन्नई येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात डॅनिल लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इशांतच्या नावावर ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. चेन्नई कसोटीतील पहिल्या डावात इशांत शर्माने २ बळी घेतले. तर दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला इशांतने लॉरेन्सला बाद केले.
इशांतआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गज वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. तर ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा इशांत शर्मा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.