चेन्नई - इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही पाहुण्या संघाने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या डावात फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात अचूक टप्यावर मारा करत इंग्लंडला १७८ धावांवर रोखले आणि भारताला विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने सर्वाधिक ६ गडी बाद केले.
चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघाला पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभारला होता. दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरूवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर रोरी बर्न्स अश्विनच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. अखेरीस इंग्लंडला कशीबशी १७८ धावांपर्यंत मजल मारता आली.