सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सिराजने अनुभवी डेव्हिड वॉर्नरला स्वस्तात बाद करत चांगली सुरूवात केली. पण त्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंत दोन चूका केल्या. यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे.
मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला (५) संघाची धावसंख्या ६ असताना बाद केले. त्याचा झेल पुजाराने टिपला. यानंतर पावसाने हजेरी लावली आणि ४ तासांचा खेळ वाया गेला. पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणारा विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन या जोडीने यजमान संघाचा डाव सावरला. दोघांनी नाबाद अर्धशतकी भागिदारी केली. यादरम्यान, पंतने पुकोव्हस्कीला दोन वेळा जीवदान दिले.