गुवाहाटी -भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला आज रविवारीपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिला सामना आज गुवाहाटी येथे रंगणार असून नवीन वर्षाची सुरूवात विजयाने करण्याचा दोन्ही संघांचा मानस असणार आहे. बर्सापारा स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
हेही वाचा -इरफान पठाणच्या निवृत्तीनंतर क्रिकेट जगतातील प्रतिक्रिया
टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन आणि दुखापतीनंतर संघात निवड झालेला जसप्रीत बुमराह या सामन्याचे आकर्षणबिंदू ठरणार आहेत. धवन दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकून त्याने आपली निवड सिद्ध केली. आता हाच फॉर्म आंतरराष्ट्रीय स्तरावर धवन पुढे सुरू ठेवू शकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल. या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिली असल्याने धवनवरील जबाबदारी वाढलेली आहे.
धवनव्यतिरिक्त सलामीवीर लोकेश राहुलसाठी स्वत: ला सिद्ध करण्यासाठी ही मालिका आणखी एक व्यासपीठ आहे. राहुलने विंडीजविरुद्ध दमदार कामगिरी नोंदवली असून लंकेविरुद्ध त्याची कामगिरी आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची प्रबळ दावेदारी ठरेल.
जुलैमध्ये बुमराह विंडीज दौर्यावरही जखमी झाला होता. त्यानंतर त्याची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. बुमराहसाठी ही मालिका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका कसोटीची ठरणार आहे.