ब्रिस्बेन -चौथ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून बॉर्डर -गावसकर ट्रॉफी कायम राखली. या विजयासह, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे.
या क्रमवारीनुसार, भारताचे आता ४३० गुण झाले आहेत. तर, दुसर्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या खात्यात ४२० गुण आहेत. तिसर्या क्रमांकावर असणार्या ऑस्ट्रेलियाचे ३३२ गुण आहेत.
यासोबतच टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे ढकलत दुसरे स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडचा संघ ११८.४४ गुणांसह प्रथम स्थानी असून भारत ११७.७५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ११३ गुण आहेत.
ऐतिहासिक कामगिरी -
सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि रिषभ पंत (नाबाद ८५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यानंतर मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले, अशा कठीण परिस्थितीत अजिंक्यने मोठ्या कौशल्याने सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीने कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला.