नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारचा दिवस 'सुपरसंडे' ठरला. एकीकडे विराटकंपनीने एकदिवसीय मालिकेत कांगारूंचा २-१ ने पराभव केला. तर, दुसरीकडे नुकत्याच सुरू झालेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने लंकेवर ९० धावांनी विजय साकारला. या विजयात महाराष्ट्राचा सुपुत्र आणि अष्टपैलू खेळाडू सिद्धेश वीर चमकला.
हेही वाचा -कोहलीचा धोनीला दणका, कर्णधार म्हणून 'या' विक्रमात टाकलं मागे
१९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने आज श्रीलंकेविरूद्ध पहिला सामना खेळला. या सामन्यात लंकेच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे फलंदाजीस उतरलेल्या बलाढ्य भारतीय संघाने ५० षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात २९७ धावा ठोकल्या. सलीमीवीर यशस्वी जयस्वाल ५९, कर्णधार प्रियम गर्ग ५६, ध्रुव जुरेल ५२ आणि सिद्धेश वीरने ४४ धावा केल्या. महत्वाचे म्हणजे सिद्धेशने २७ चेंडूत ६ चौकारांसह ४४ धावा चोपल्या. लंकेकडून अम्शी डी सिल्वा, एशियन डॅनियल, दिलशान मदूशानका, काविंदू नादिशा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेचा संघ २०७ धावांवर आटोपला. लंकेच्या रविंदू रसंथा ४९ आणि कर्णधार निपून धनंजयाच्या ५० धावांमुळे लंकेला दोनशेचा आकडा गाठता आला. भारताकडून आकाश सिंग, रवि बिश्नोई आणि सिद्धेश वीरला प्रत्येकी दोन बळी मिळाले. सिद्धेशला या सामन्यासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे