मुंबई - भारतीय संघाने अखेरच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात विंडीजला ६७ धावांनी धूळ चारत मालिकेत २-१ अशी बाजी मारली. विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा रोहित शर्मा, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी आक्रमक अर्धशतकं झळकावली. याच खेळींच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकात ३ बाद २४० धावांचा डोंगर उभारला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचा नजराणा पेश करत विंडीजला ८ बाद १७३ धावांवर रोखलं. दरम्यान, या मालिकेत आश्वासक कामगिरी केलेल्या कर्णधार विराट कोहलीला 'मालिकावीर' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
विंडीजविरुद्धच्या मालिकेत मालिकावीरचा पुरस्कार पटकवल्यानंतर विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये मालिकावीरचा पुरस्कार तब्बल ६ वेळा पटकावला. अशी कामगिरी करणारा विराट जगातील एकमेव खेळाडू आहे. या यादीत एकही खेळाडू सध्या विराटच्या जवळपास नाही. विराटनंतर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, बांगलादेशच्या साकीब अल हसन, पाकिस्तानचा बाबर आझम, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी ३ वेळा मालिकावीरचा पुरस्कार पटकावला आहे.