पुणे - दक्षिण आफ्रिकेविरुध्द गहुंजे मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात दोनही डावात शतके झळकवल्याने, याही सामन्यात तो दमदार खेळी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने त्याला बाद करत अपेक्षा फोल ठरवली. दरम्यान, रबाडाने रोहितला आजघडीपर्यंत एकूण ८ वेळा माघारी धाडले आहे.
रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा बाद करण्याचा विक्रम न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज टिम साउदी आणि ट्रेंट बोल्टच्या नावे आहे. या दोघांनी रोहितला आतापर्यंत तब्बल ८ वेळा माघारी धाडले आहे. रबाडाने आजच्या सामन्यात रोहितला बाद करत या विक्रमाशी बरोबरी साधली. दरम्यान, आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने रोहितला ७ वेळा बाद करण्याचा कारनामा केला आहे.