अहमदाबाद - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला उतरला. या दोघांनी इंग्लंड गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. दोघांनी ८.५ षटकात ९४ धावांची सलामी दिली. याच सलामीच्या जोरावर भारतीय संघाला २२४ धावांचा डोंगर उभारता आला. परिणामी भारतीय संघाने हा सामना ३६ धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतर विराटने, यापुढे देखील सलामीला खेळण्याचे संकेत दिले आहेत.
'मी आयपीएलच्या १४व्या हंगामात सलामीला खेळणार आहे. मी याआधीही अनेकदा वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आमची मधली फळी फार मजबूत आहे. त्यामुळे २ सर्वश्रेष्ठ खेळाडूंना टी-२० क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त चेंडू खेळायला मिळाले तर चांगलेच आहे, असे कर्णधार विराट कोहली सामना संपल्यानंतर म्हणाला.
पुढे विराट म्हणाला 'मला निश्चितच रोहितसोबत सलामी करायला आवडेल. आम्ही दोघे सलामीला आलो. दोघे सेट झालो. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाचा दोघांपैकी एकजण तरी चांगलाच समाचार घेईल, असे मला वाटते. आम्ही दोघांनी चांगली सुरुवात केल्याने मागील फलंदाजांनाही चांगलं व्यासपीठ तयार होईल. ते ही मैदानात निडरपणे खेळतील. जे की संघासाठी चांगली गोष्ट आहे. मी सलामीलाच खेळत राहणार. आगामी विश्वकरंडकापर्यंत सलामीला खेळण्याचा माझा मानस असेल, असेही विराटने यावेळेस स्पष्ट केले. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात विराटने रोहित शर्मासोबत सलामीला येत नाबाद ८० धावांची खेळी साकारली.
हेही वाचा -Ind vs Eng ५th T२० : भारताने अंतिम सामन्यासह मालिका ३-२ ने जिंकली
हेही वाचा -महिला क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या टी-२० सामन्यात भारतावर ८ गडी राखून विजय